पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व र्त्यंने सांगितले.
अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानचा राजा ओग यांना परमेश्वराने ठार मारल्यानंतरची ही गोष्ट आहे. (सीहोन अमोरी लोकांचा राजा होता. तो हेशबोनमध्ये राहात असे. ओग बाशानचा राजा होता. तो अष्टेरोथ व एद्रई येथे राहाणारा होता.)
आता तुम्ही इथून अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशात जा. आसपासच्या सर्व प्रदेशात प्रवास करा. यार्देनेच्या खोऱ्यात, अराबांच्या पहाडी प्रदेशात, पश्चिमेकडील उतारावर, नेगेवमध्ये समुद्रकिनारी जा. कनान आणि लबानोन मार्गे फरात या महानदीपर्यंत जा.
पाहा हा प्रदेश मी तुम्हाला देऊ करत आहे. जा आणि त्यावर ताबा मिळवा. अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांना हा प्रदेश देण्याचे मी वचन दिले होते.”‘
“म्हणून मी त्या ज्ञानी व अनुभवी व्यक्तींना तुमचे प्रमुख म्हणून नेमले. हजारांच्या समूहावर एक अधिकारी, शंभरांवर एक, पन्नासावर, दहावर तसेच घराण्यावर अशा या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
“या न्यायाधीशांना मी त्यावेळी सांगितले की तुमच्या भाऊबंदांतील वाद नीट ऐकून घ्या. निवाडा करताना पक्षपात करु नका. मग तो वाद दोन इस्राएलींमधला असो की एक इस्राएली व एक उपरा यांच्यातील असो. नीतीने न्याय करा.
कोणालाही कमी अधिक लेखू नका. सर्वांना समान लेखा. कोणाचीही भीती बाळगू नका. कारण तुम्ही दिलेला न्याय हा देवाचा आहे. एखादे प्रकरण तुम्हाला विशेष अवघड वाटले तर ते माझ्याकडे आणा. मी त्याचा निवाडा करीन.
“मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो. तेव्हा वाटेत आपल्याला ते विस्तीर्ण आणि भयंकर वाळवंट लागले. ते ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोचलो.
पण तेव्हा तुम्ही सगळे मला म्हणालात की, आधी आपण काही जणांना त्या प्रदेशाच्या पाहाणीसाठी पुढे पाठवू. म्हणजे ते त्या देशाची माहिती मिळवून आपल्याला कोणत्या मार्गाने जावे लागेल, कोणकोणती नगरे तेथे लागतील याची खबर आणतील.
तुम्ही आपापल्या तंबूत जाऊन कुरकुर करत म्हणालात की परमेश्वर आमचा द्वेष करतो. अमोऱ्यांच्या हातून आमचा नाश व्हावा म्हणूनच आम्हाला त्याने मिसर देशातून बाहेर काढले.
आता आम्ही कुठे जाणार? आमच्या या भावांच्या ( 12 हेरांच्या) बातम्यांमुळे घाबरुन आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यांच्या खबरीनुसार हे लोक धिप्पाड व आमच्यापेक्षा उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांची तटबंदी आकाशाला भिडली आहे. आणि तेथे अनाक वंशी महाकाय आहेत.
यफुन्नेचा मुलगा कालेब मात्र तो पाहील. त्याचे पाय या भूमीला लागले आहेत. त्याला व त्याच्या वंशजांना मी ही भूमी देईल. कारण तो परमेश्वराचा खरा अनुयायी आहे.’
“परमेश्वर पुढे आपल्याला म्हणाला, ‘शिवाय आपले शत्रू आपल्या मुलाबाळांना पळवतील असे तुम्ही म्हणालात. ती मात्र या देशात जातील. मी मुलांवर तुमच्या चुकांचे खापर फोडत नाही. कारण बरे वाईट ठरविण्याइतकी ती मोठी नाहीत.
“मग तुम्ही मला म्हणालात की आमच्या हातून पाप घडले आहे. आपल्या परमेश्वर देवाच्या आज्ञेनुसार आम्ही वर जाऊन लढू. मग तुम्ही शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज झालात. तो डोंगराळ भाग सर करणे सहज जमेल असे तुम्हांला वाटले.